‘B.1.617’ हा धोकादायक व्हेरियंट भारतीय नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

'B.1.617' हा धोकादायक व्हेरियंट भारतीय नाही, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

मागील काही दिवसांपासून भारतात आढळलेल्या B.1.617 या कोरोना व्हेरियंट हा भारतीय व्हेरियंट असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. WHO च्या हवाल्यानं या बातम्या जगभरात प्रसिद्ध होत आहेत. या व्हेरियंटवर आता केंद्र सरकारनं स्पष्टीकरण दिलं आहे. B.1.617 हा धोकादायक व्हेरियंट भारतीय नसल्याचं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) भारतात आढळलेला B.1.617 हा व्हेरियंट खूप धोकादायक असून आगामी काळात जगासाठी चिंतेचा विषय ठरणार असल्याचं म्हटलं आहे. पण काही प्रसारमाध्यमांनी B.1.617 हा व्हेरियंटला भारतीय असल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय व्हेरियंटबद्दल आलेल्या बातम्या तथ्यहीन आहेत. याला कोणताही पुरवा नसून यावर कोणत्याही प्रकारचं संशोधन करण्यात आलेलं नाही, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.

केंद्र सरकारनं आपल्या स्पष्टीकरणात पुढे म्हटलेय की, जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या 32 पानाच्या अहवालात कुठेही B.1.617 या कोरोना व्हेरियंटला भारतीय व्हेरियंट म्हटलेलं नाही. इतकेच नव्हे तर WHO नं याबाबत “भारतीय” या शब्दाचाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

भारतात आढळलेल्या कोरोनाच्या B.1.617 या व्हेरियंटनं जगभरात हाहाकार माजवला आहे. हा व्हेरियंट १५ पट अधिक संक्रमणकारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. पण त्याचबरोबर या व्हेरियंटविरोधात लस आणि कोरोनाच्या रुग्णांवर होत असलेले उपचार प्रभावी आहेत, असा दावाही WHOचे भारतातील प्रतिनिधी डॉ. रोडेरिको एच. ऑफरिन यांनी केला आहे.

दरम्यान, भारतात कोरोनाची (India Corona Update) रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्यूचे प्रमाण वाढलं आहे. सोमवारी देशात 3 लाख 29 हजार नवीन रुग्ण (New Covid Cases in India) सापडले होते. मंगळवारी त्यात वाढ झाली असून दिवसभरात 3 लाख 48 हजार 421 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासात 4 हजार 205 मृत्यू झाले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. देशात याआधी 7 मे रोजी एकाच दिवशी 4 हजार 187 इतक्या मृत्यूची नोंद झाली होती.