नागपूर : सध्या अनेक रुग्ण कोरोनाची लक्षणे नसलेले आढळले आहेत. या प्रत्येकाची टेस्ट करणे शक्य होत नसल्याने भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) शिफारस केल्यानुसार, ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’ च्या माध्यमातून शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजून कोरोना संसर्गासाठी गंभीर जोखीम असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथील प्रतिबंधित क्षेत्रात ही पहिली चाचणी घेण्यात आली आणि ती यशस्वीही झाली.
या प्रयोगाच्या वेळी वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जात आहेत. कोरोना संक्रमण काळात गृह, संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांची संख्या मोठी आहे. एखादा रुग्ण आढळल्यास प्रतिबंधित केला जाणारा परिसरही मोठा असतो. सध्या अनेकांना कोरोनाची लक्षणेही दिसत नाहीत. अशा स्थितीत रुग्णांचा शोध घेणे अवघड होते. प्रत्येकाची चाचणी करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत रुग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आणि विलगीकरणात असलेल्यांची माहिती संकलित ठेवण्याचे कार्य आशा सेविकेकडून केले जाते. त्यामुळे त्यांना अशी माहिती घेण्यासोबतच रुग्णांचीही माहिती मिळावी, यासाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट, वन मिनिट सिट अप टेस्ट’ ची माहिती देण्यात आली.
या टेस्टच्या माध्यमातून रुग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. त्यामुळे कोरोनाची लक्षणे वरकरणी दिसत नसली, तरीही रुग्णांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
46 जणांवर यशस्वी चाचणी
वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथील कंटेन्मेंट झोनमध्ये या चाचणीचे प्रात्यक्षिक करून दाखवत आशा सेविकांना माहिती देण्यात आली. यावेळी 46 जणांची सिक्स मिनिट वॉक टेस्ट घेण्यात आली.
रुग्णाची माहिती लवकर मिळणे शक्य : जिल्हाधिकारी भीमनवार
‘आयसीएमआर’ने शिफारस केलेली ही चाचणी आहे. अनेकदा आजाराची लक्षणे दिसत नाहीत. सहा मिनिट चालल्यास ऑक्सिजनच्या पातळीवरून आजाराविषयी माहिती मिळते. यातून रुग्णाची लवकर माहिती मिळणे शक्य होते. पुढील काळात इतर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ही चाचणी घेण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले.
अशी आहे ‘सिक्स मिनिट वॉक’ चाचणी
सलग सहा मिनिटे चालायचे, एक मिनिट उठाबशा काढायच्या आहेत. जे चालू शकत नाहीत, त्यांना वन मिनिट सिट अप टेस्टचा पर्याय दिला आहे. टेस्टपूर्वी आणि टेस्टनंतर रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ऑक्सिमीटरने तपासले जाते. ऑक्सिजनची पातळी 94 च्या खाली असल्यास व्यक्ती गंभीर परिस्थितीकडे वाटचाल करण्याची शक्यता असल्याने त्यास उपचारार्थ दाखल केले जाणार आहे. या चाचणीत कोरोनाच नव्हे, तर अस्थमा, हृदयरोग, फुफ्फुसाचे इतर आजार, न्यूमोनिया या आजारांचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे हायरिस्क व्यक्तींवर विशेष देखरेख ठेवता येऊ शकते.
Also Read- नागपूर: सावकारी प्रकरणात एकाला अटक