विदर्भाचा बालेकिल्ला कायम राखण्यासाठी काँग्रेसची धडपड

काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गढ म्हणून ओळखला जात आहे.

नागपूर : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भात अलीकडे काँग्रेसचा बुरूज ढासळला, परंतु काँग्रेसने पुन्हा जुने दिवस परत यावेत म्हणून विदर्भावरच लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेस नेते व पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह इतरही प्रमुख नेते सभांच्या माध्यमातून हा प्रदेश पिंजून काढत आहेत.

आणीबाणीनंतरच्या काळात संपूर्ण देशात काँग्रेसची पीछेहाट होत असतानाच मात्र विदर्भाने पक्षाला साथ दिल्याचा इतिहास आहे. एवढेच नव्हे तर ज्या पक्षासोबत विदर्भ त्या पक्षाची राज्यात सत्ता असेही चित्र राज्याच्या राजकारणात आहे. काँग्रेसच्या राज्यातील सत्ताकाळात विदर्भाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. मात्र, गेल्या दोन दशकांत चित्र बदलले. काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपचा गढ म्हणून ओळखला जात आहे. २०१४ च्या निवडणुकीत भाजपने या भागातील ६२ पैकी ४४ जागांवर विजय मिळवला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विदर्भातील आहेत हे येथे उल्लेखनीय. या भागात अजूनही मोठय़ा प्रमाणात काँग्रेसला मानणारा मतदार मोठय़ा प्रमाणात आहे. ही बाब ओळखूनच काँग्रेसने या निवडणुकीत विदर्भावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह छत्तीसगडचे मुख्यमंत्री, लोकसभेतील पक्षाचे माजी नेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह इतरही नेते विदर्भात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. मंगळवारी राहुल गांधी यांच्या यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्य़ात सभा झाल्या. यवतमाळ जिल्ह्य़ातील वणी येथे वामनराव कासावार आणि वर्धा जिल्ह्य़ातील आर्वी येथे अमर काळे पक्षाचे उमेदवार आहेत. मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही विदर्भाचा दौरा केला. येत्या दोन दिवसांत सरचिटणीस प्रियंका गांधी यांचा नागपुरात रोड शो घेण्याचे नियोजन आहे.

गेल्या वेळी दहाच जागी विजय

२०१४ च्या विधानसभेत काँग्रेसने विदर्भात ६२ पैकी दहा जागा जिंकल्या होत्या. राज्यातील सत्ता स्थापनेत विदर्भ हा घटक महत्त्वाचा राहिला आहे. राज्यात सत्तेचा स्थापनेचा मार्ग विदर्भातून सुकर झाला आहे. ज्या पक्षाला येथे सर्वाधिक जागा मिळतात, त्या पक्षाचे सरकार राज्यात स्थापन होते हा आजवरचा अनुभव आहे. त्याच दृष्टीने काँग्रेसने विदर्भावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.