नागपूर : विविध कंपन्यांसाठी कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांचे कोळसा चोरांशी साटेलोटे असून कोळसा खाणीतून कोळसा चोरीचा प्रकार सुरू होतो. यावर निर्बंध घालण्यासाठी आता वेकोलि प्रशासनालाच कारवाई करण्याची आवश्यकता आहे. कारण, स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादानेच कोळसा चोरांचे फावत आहे.
खापरखेडा, कन्हान परिसरातील कोळसा खाणींमधून मोठय़ा प्रमाणात कोळसा चोरी करण्यात येत आहे. कोळसा चोरीतून मिळणाऱ्या बक्कळ पैशांसाठी ग्रामीण भागात गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील खाणींवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात गुन्हेगारांमध्ये अनेकदा टोळीयुद्धही झाले आहेत. खापरखेडा, कन्हान व कामठी परिसरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रामुख्याने किल्ले कोलार परिसरात गुड्ड बंगाली, उमेश पानतावणे, अरविंद भोये, कामठी परिसरात सोनू हाटे हे कोळसा चोरीतील मोठी नावे आहेत. यातील सोनू हाटे याला कुख्यात कालू हाटे व कामठी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष कुख्यात रणजीत सफेलकर यांचा आशीर्वाद प्राप्त आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळसा चोरीसाठी त्यांनी एनटीपीएस, महाजेनकोमध्ये कोळसा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या ट्रकचालकांशी हात मिळवणी केली. ट्रकचालकांना एका टनमागे ४०० ते ५०० रुपये दिले जातात. त्यासाठी ट्रकचालक हा रस्त्यावर काही ठिकाणी जाणीवपूर्वक कोळसा पाडतो. त्यानंतर कोळसा चोर तो कोळसा उचलतात व खुल्या बाजारात विकतात. काही महिन्यांपूर्वी शहरातील परिमंडळ-५ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनात कामठीच्या सोनू हाटेवर कारवाई करण्यात आली होती. आता पुन्हा तो या व्यवसायात सक्रिय झाला आहे. मात्र, खापरखेडा व कामठी परिसरात इतरांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. याचे कारण स्थानिक पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात विचारणा केली असता ग्रामीण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी संबंधितांवर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
एका टिप्परमधून २० ते २३ टन कोळशाची वाहतूक करण्यात येते. मात्र, ट्रकचालक कोळसा खाणीतील वजन काटय़ावरील कर्मचाऱ्याशी संगनमत करतात. बाहेर एका टनाकरिता ४०० ते ५०० रुपये कोळसा तस्करांकडून घेतात. त्यापैकी प्रति टन १०० रुपये वजन काटय़ावरील कर्मचाऱ्याला देतात. अशाप्रकारे ट्रकचालक एका ट्रकमध्ये चार ते पाच टन अधिकचा कोळसा भरून घेतात व तो कोळसा तस्करांपर्यंत पोहोचवतात.
अधिक वाचा : नवरा बायकोमध्ये भांडण; आईने मुलाला विष पाजले, मुलाचा मृत्यू