नागपूर: पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्क आणि उपकरामध्ये प्रत्येकी एक रुपयांची वाढ आणि प्रतिलिटर एक रुपया अधिभार लावण्यात आल्याने पेट्रोल-डिझेल महागणार आहे. त्यामुळे या दरवाढीचा एकूणच अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असून, सर्वसामान्यांच्या खिशावरही त्याचा भार पडणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध केला जात आहे. पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर एक रुपया उपकर (सेस) लावण्यात आला आहे. या आधीही प्रतिलिटर आठ रुपये सेस लावण्यात आलेला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री म्हणून आपला पहिला अर्थसंकल्प शुक्रवारी संसदेत सादर केला. पेट्रोल-डिझेलच्या अतिरिक्त करात प्रत्येकी एक रुपयांची वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ होणार आहे. त्यामुळे पेट्रोल अडीच रुपयांनी, तर डिझेल दोन रुपये ३० पैशांनी महागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐंशी रुपयांच्या खाली असणारे पेट्रोलचे दर पुन्हा ऐंशीच्या घरात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दैनंदिन पेट्रोल खरेदीचा भार वाढणार आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतुकीवर होऊन, पर्यायाने मालवाहतूक देखील महागेल. परिणामी, जीवनावश्यक वस्तू देखील महागण्याची शक्यता आहे.
नोकरदार वर्गाने पेट्रोल-डिझेल महागण्याचा निषेध व्यक्त केला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदार काही महिने पेट्रोलचे दर नव्वदी पार गेले होते. आता देखील पेट्रोल-डिझेल महाग केल्याने सामान्य नागरिकांवर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तर, विद्यार्थ्याने पेट्रोल दरवाढ म्हणजे ‘पॉकेट मनी’वरच घाला असल्याचे म्हटले आहे.
अधिक वाचा: नागपुरात रेल्वेचे फिरते एटीएम