नागपूर: महाराष्ट्रात महायुतीलाच कौल मिळणार आहे. येत्या २१ तारखेला मतदान होत आहे. २४ तारखेला मतदान यंत्रातून कमळच निघेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात व्यक्त केला. महायुतीला मताधिक्य मिळेल आणि दोन-तृतीयांश जागा महायुती जिंकेल. महायुतीच्या विजयानंतर या ठिकाणी मी जल्लोषासाठी येणार आहे, असा शब्दही त्यांनी नागपुरकारांना दिला. दरम्यान, दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील रोड शोला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदार संघातील उमेदवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपुरात रोड शो झाला. रोड शोला प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले. महायुतीचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. ‘निवडणुकांसाठी २१ तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. महाराष्ट्रात फिरून आलो. महाराष्ट्रात महायुतीलाच कौल मिळणार आहे,’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच कौल द्यायचा असं महाराष्ट्रानं ठरवलं आहे. महायुतीलाच कौल मिळणार आहे. भाजप-शिवसेना-रिपाइं, रासप आणि अन्य घटकपक्षांच्या महायुतीला प्रचंड मताधिक्य मिळेल आणि दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळणार आहेत. हा एक नवा विक्रम असेल. राज्यात पारदर्शी कारभार केला आहे. प्रत्येक समाजाचं चित्र बदलायचं काम केलंय. नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली विदर्भाचं चित्र बदललं आहे. आता पुन्हा जनतेसमोर चाललो आहे. जनतेचं इतकं प्रेम आणि प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद अभूतपूर्व विजय मिळवून देणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतदानाचा दिवस हा युद्धाच्या दिवसासारखा आहे. लोकशाहीचं युद्ध आहे. हे विचारांचं युद्ध आहे असं सांगून प्रत्येक कार्यकर्ता बूथवर आणि घराघरांत पोहोचला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. २१ तारखेला निवडणूक मतदान होत आहे. २४ तारखेला मतमोजणीवेळी मतदान यंत्रातून कमळच निघेल. त्यानंतर जल्लोषासाठी मी याच ठिकाणी येईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.