नागपूर: हवामान खाते व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या कडून प्राप्त माहिती नुसार नागपूर आणि शहरा लगत येत्या ४८ तासात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीच्या काठावर राहणा-या नागरिकांनी विशेषत: नदी नाल्या जवळील खोलगट भागातील नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच पिवळी नदीच्या काठावर मुख्यता समतानगर व अन्य झोपडपट्टी, नाग नदीच्या काठावर नंदनवन झोपडपट्टी आणि पोहरा नदीच्या काठावर हुडकेश्वर नाला आणि रस्त्या लगत राहणा-या नागरिकांनी सर्तक राहून म.न.पा. ला सहकार्य करावे.
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पुर परिस्थितीत नागरिकांना आसरा देण्यासाठी लगतच्या म.न.पा. शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे शिकस्त घरे पडणे, रस्त्यावरील झाडे कोसळणे वाहतुकीच्या मुख्य रोडवर तसेच अंतर्गत रस्त्यावर पाणी साचुन राहणे इत्यादी बाबी प्रामुख्याने आढळून येतात. पावसामुळे जिवीत व वित्त हानी होणार नाही याकरीता म.न.पा.चे केंद्रीय कार्यालयस्थित अग्निशामक विभागात एक नियंत्रण कक्ष उघडण्यात आला असून या नियंत्रण कक्षात अधिकारी व कर्मचारी यांची दोन/तिन पाळीत सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
नियंत्रण कक्षाचा दुरध्वनी क्र. ०७१२-२५६७०२९, ०७१२-२५६७७७७ व वायरलेस क्र. ०७१२-३०३११०१ व १०१, १०८ आहे. तसेच आवश्यकतेनुसार रात्रभर नियंत्रण कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांची सेवा उपलब्ध राहील. व उर्वरित वेळेत नियमितपणे आरोग्य विभाग, जलप्रदाय विभाग, लोककर्म विभाग, विदयुत विभाग यांच्या सेवा देखील उपलब्ध राहतील.
नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख श्री. राजेंद्र उचके यांनी सांगितले की, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे यावर्षी सहा रबर पावर बोट तयार करण्यात आले असून, या बोटवर प्रत्येकी चार कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या व्यक्तीरिक्त पन्नास जीवन रक्षक जॅकेट व पन्नास रक्षक युवकांच्या चमूचे गठन करण्यात आले आहे. जे कोणत्याही विपरित परिस्थिला तोंड देवू शकतात.
म.न.पा. व्दारे प्रत्येक झोनला वस्त्यांत जमा होणारे पाणी निचरा करण्यास्तव दोन पंप देण्यात आले असून पंपाची संख्या १० वरुन २० करण्यात आलेली आहे. प्रत्येक झोनला एक नियंत्रण कक्ष उघडण्यात आलेले आहे. जे अहोरात्र काम करतील. प्रत्येक झोनला स्वतंत्र चमूचे सुध्दा गठण करण्यात आले असून वीस होमगार्ड सह पंचेचाळीस कर्मचा-यांची सुध्दा नियुक्ती करण्यात आली आहे.
अधिक वाचा : खवळलेल्या पाकने वाघा सीमेवर समझौता एक्स्प्रेस रोखली