नागपूर : राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांनी बनावट दस्तऐवजाद्वारे प्रवेश घेतल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी विद्यार्थ्यांसह आठ कंपन्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत ही बोगस भरती झाली. महाविद्यालयाचे संचालक गुरुदेवसिंग डलजितसिंग सैनी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
अनिल कुमार रा. हरियाणा, बिहार येथील जूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड , पोषी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, नॅशनल शुगर अॅण्ड केमिकल लिमिटेड, भारत हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान इलेक्ट्रॉनिक अॅण्ड इक्विपमेंट लिमिटेड, टेकनेक कॉम्बो मेन्टनेन्स लिमिटेड व राजस्थान येथील पॅसिफिक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपन्यांची नावे आहेत.
महाविद्यालयात देशभरातील प्रशिक्षणार्थ्यांना अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येते. कंपन्यांनी पाठविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांनाही येथे प्रशिक्षण देण्यात येते. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र देण्यात येते. या प्रमाणपत्राच्या आधारे प्रशिक्षणार्थ्यांना कंपनीत नोकरी मिळते. बिहार, हरियाणा व राजस्थानमधील कंपनीची नावे व प्रमाणपत्राचा वापर करून २०१२ ते २०१६ या कालावधीत ३५० प्रशिक्षणार्थ्यांनी महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले. यापैकी अनेकांना कंपनीत नोकरीही मिळाली.
ज्या कंपन्यांच्या नावाचा वापर करून प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले, प्रत्यक्षात त्या कंपन्याच अस्तित्वात नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व माजी महापौर कल्पना पांडे यांना मिळाली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयात याबाबत तक्रार केली. गृहमंत्रालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आदेशानंतर चौकशी समितीची स्थापना करण्यात आली. समितीने दस्तऐवजांची तपासणी केली. कंपन्या अस्तित्वात नसल्याचे समोर आले. समितीने चौकशी अहवाल गृहमंत्रालयात सादर केला. त्यानंतर गृहमंत्रालयाने सैनी यांना पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. सैनी यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
अधिक वाचा : घर को बना दिया पक्षियों का बसेरा