भाजपाने 2612 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली आहे

भाजपाने 2612 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली आहे

राज्याच्या 34 जिल्ह्यातील एकूण 12,711 ग्राम पंचायतींसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकींचे निकाल जाहीर होत असून, आतापर्यंत आलेले निकाल आणि कल पाहू जाता, भाजपाने 2612 ग्रामपंचायती जिंकून मुसंडी मारली आहे. त्याखालोखाल शिवसेनेला 2387, राष्ट्रवादी काँगे्रसला 2407, काँगे्रसला 1765 आणि इतर व अपक्षांना 2156 जागा मिळण्याची शक्यता आहे.

अद्याप पूर्ण निकाल हाती आले नसून, प्रत्येकच पक्ष आम्हालाच घसघशीत यश मिळाल्याचा दावा करीत आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून सत्तारूढ महाविकास आघाडीच्या कारकीर्दीवर जनतेने पसंतीची मोहोर उमटवली असल्याचे आघाडीच्या नेत्यांचा दावा आहे. परंतु, तीन पक्षांशी लढत देत क्रमांक एकवर आलो आहोत. यावरून जनता आघाडी सरकारवर नाराज असून त्यांनी भाजपावर विश्वास दाखविला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपाने दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या गटाची सरशी झाली असून, तालुक्यातील 68 पैकी 45 ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भाजपाला लक्षणीय यश मिळाले आहे. मूल तालुक्यात 24, पोंभुर्णा तालुक्यात 17, चंद्रपूर तालुक्यात 12 तर बल्लारपूर तालुक्यात 8 ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

भंडारा जिल्ह्यातील 148 पैकी 79 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँगे्रस 175, शिवसेना 157, काँग्रेस 55, भाजपा 116, माकप 8, इतरांना 109 जागा मिळाल्या आहेत. अहमदनगरच्या राहाता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाच्या ताब्यात गेल्या असून, संगमनेर तालुक्यातही भाजपाने जोरदार मुंसडी मारली आहे. घ(वृत्तसंस्था)