नागपूर : अनारक्षित तिकिटे शक्यतो अॅपद्वारेच काढावी, असे आवाहन दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने केले आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने मोबाइलवर अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, या यंत्रणेचा पाहिजे तसा उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या अॅपच्या प्रचारार्थ रेल्वे कर्मचाऱ्यांसह स्काऊट अॅण्ड गाइड्सचे विद्यार्थी प्रवाशांपर्यंत पोहचून तिकीट काढण्यासाठी अॅपचा उपयोग करण्याचे आवाहन करीत आहेत. तसेच अॅप विषयी सविस्तर माहिती देत आहेत.
कॅशलेस व्यवहार, पर्यावरण पूरक पेपरलेस तिकीट या संकल्पनांना चालना देण्याच्या दृष्टीने रेल्वेने ‘यूटीएस अॅप’द्वारे अनारक्षित रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे घरबसल्या केवळ एका क्लिकवर रेल्वे तिकीट काढणे शक्य झाले आहे. त्यामुळे लांबलचक रांगांमध्ये उभे राहण्याचा मनस्तापही कमी झाला आहे. परंतु, अजूनही अॅपचा पाहिजे तसा वापर होताना दिसत नाही.
अॅपचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवर ‘हेल्पडेस्क’ सुरू करण्यात आले आहे. येथून प्रवाशांना अॅप डाऊनलोड करण्यासह उपयोग करण्याच्या पद्धतीविषयी माहिती दिली जात आहे. याशिवाय बॅनर, भीत्तीपत्रक, पत्रके, उद्घोषणा प्रणालीवरूनही प्रवाशांना ‘यूटीएस मोबाइल अॅप’च्या वापराची माहिती दिली जात आहे.
वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमना यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकांवर शिबिरांचे आयोजन करून वाणिज्य निरीक्षकांकरवी अॅपसंदर्भात जागृतीचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय भारत स्काऊट अॅण्ड गाइडच्या मदतीनेसुद्धा प्रवाशांपर्यंत अॅपसंदर्भातील माहिती पोहचविली जात आहे. अॅपद्वारे तिकीट काढणे फारच सोपे असून स्टेशनपासून ५ किलोमीटर ते २५ मीटर परिघात तिकीट काढणे शक्य आहे.
अधिक वाचा : नागपूर : ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक ; चार ठार