नागपूर : ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक ; चार ठार

Nagpur नागपूर

नागपूर : भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या नादुरुस्त ट्रकवर धडकली. या भीषण अपघातात चौघे ठार, तर २० जण जखमी झालेत. ही घटना नागपूर-उमरेड मार्गावर चांपा शिवारात घडली. जखमींना नागपूर येथील मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पती-पत्नीचाही समावेश आहे.

शंकर कटुजी केवट (४५), प्रमिला शंकर केवट (४५) दोघेही रा. नरसाळा, नागपूर, सोनू महादेव ठाकरे ३१ व ट्रॅव्हल्स चालक कार्तिक ईश्वर गोंगल ३५ रा. उमरेड यांचा समावेश आहे. ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ४९ एटी ६७५४ ही उमरेड येथून नागपूरला येत होती. याच दरम्यान चांपा शिवारात ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी ७६५६ हा रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत उभा होता.

रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास ट्रॅव्हल्स चालकाला हा नादुरुस्त ट्रक न दिसल्याने भरधाव वेगात असलेली ट्रॅव्हल्स ट्रकवर मागच्या बाजूने आदळली. यात चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कुही पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यापूर्वी नागरिकांनी जखमींना मिळेल त्या वाहनाने नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठविले होते.

या अपघातामुळे नागपूर-उमरेड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने बाजूला करून मार्ग मोकळा केला. या प्रकरणी कुही पोलिसांनी दोन्ही वाहन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा : The Show Stopping Bridal Collection showcased at Lakmé Salon, Sadar – Nagpur