लहान मुलाचा आईने व्हिडिओ काढल्याने राग; पती, सासू-सासऱ्यांनी केली बेदम मारहाण

लहान मुलाचा आईने व्हिडिओ काढल्याने राग; पती, सासू-सासऱ्यांनी केली बेदम मारहाण

पुणे: सासरी असलेल्या लहान मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या आईने मुलाचा व्हिडिओ काढल्याचा राग आल्याने पतीसह सासू सासऱ्यांनी तिला बेदम मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार लोणी काळभोर परिसरात घडला.

पुनम प्रकाश जगताप (वय २६, रा. सध्या आळंदी म्हातोबाची) यांनी या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती प्रकाश जगताप, सासू शोभा जगताप, सासरे बाळासाहेब जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे लोणी काळभोरच्या रायवाडीत सासर आहे. तर, गेल्या काही महिन्यांपासून कुटुंबातील वादामुळ‌े त्या आळंदी म्हातोबाची येथे त्यांच्या माहेरी राहात आहेत. मात्र, त्यांचा लहान मुलगा सासरीच आहे. त्यामुळे फिर्यादी त्यांच्या भावासह १४ एप्रिलला सासरी त्यांच्या लहान मुलाला भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी मोबाइलमध्ये मुलाचा व्हिडिओ काढला. त्याचा सासरच्या मंडळींना राग आला. त्यामुळे फिर्यादीच्या पतीने त्यांच्या कानाखाली मारले आणि मोबाइल फेकून दिला. तर, सासूने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यात मारले आणि सासऱ्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, फिर्यादीचा भाऊ अमोल जाधव यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जयंत हंचाटे पुढील तपास करत आहेत.

आरोपी करोना पॉझिटिव्ह                                                                                                      फिर्यादीची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीचा पती करोनाबाधित असल्याचा रिपोर्ट त्यांनी पोलिसांना सादर केला. त्यामुळे पतीसह सासू आणि सासरे होम क्वारंटाइन आहेत, अशी माहिती तपास अधिकारी व उपनिरीक्षक जयंत हंचाटे यांनी दिली.