नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना प्रतिवादी म्हणून वगळण्यात यावे, अशी याचिकाकर्त्याने केलेली विनंती मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने मान्य केली.
देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचाऱ्यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला, असा आरोप करणारी याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली. त्यावर न्या. प्रदीप देशमुख आणि न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेत अॅक्सिस बँकेच्या पदाधिकारी अमृता फडणवीस यांनाही प्रतिवादी करण्यात आले. परंतु, अमृता फडणवीस यांचे नाव प्रतिवादी म्हणून वगळण्यात यावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना अॅड. सतीश उके यांनी केली. याचिकेत नमूद मुद्द्यांवर सरकारने अभ्यास करून दोन आठवड्यांत माहिती द्यावी, असे कोर्टाने नमूद केले. दरम्यान, जबलापुरे यांनी अॅक्सिस बँकेत सरकारी कर्मचाऱ्यांची खाती वळण्यात आल्याची तक्रार ईडीकडे केली आहे. त्याची ईडीने निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केली आहे.