नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा देखील मंजूर करण्यात आला आहे. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी फोनही बंद ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीला अवघा एक महिना बाकी असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्याचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुण्यात पूरग्रस्तांच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केल्याचं सांगण्यात येतं. शरद पवार यांच्याशी चर्चा न करताच अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच पक्षातील कोणत्याही नेत्याला त्यांनी राजीनाम्याची पूर्वसूचना दिली नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं. शिवाय पक्षांतर्गत कुरबुरींमुळेही त्यांनी राजीनामा दिला असावा असा कयास वर्तवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शिखर बँक घोटाळ्यातही अजित पवार यांचं नाव आल्यानेही त्यांनी राजीनामा दिला असावा असंही सांगण्यात येतं.
दरम्यान, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही अजित पवार यांनी विधीमंडळाच्या कार्यलयात येऊन माझ्या पीएकडे राजीनामा दिला. तसेच मला फोन करून राजीनामा मंजूर करण्याची विनंती केल्याचं सांगितलं. राजीनामापत्रात त्यांनी कोणतंही कारण दिलेलं नाही. तसं कारणही देत नसतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेते मुंबईत दाखल झाले होते. मात्र अजित पवार हे मुंबईत दाखल झाले नव्हते. त्यावरही आश्चर्य व्यक्त केलं गेलं होतं. अजित पवार पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेल्याचं सांगण्यात येत होतं.