ताडोब्याचे दरवाजे मंगळवारपासून उघडणार

Tadoba

नागपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर झोनमध्ये पर्यटकांसाठी मान्सून सफारी १ जुलैपासून बंद झाली होती. आता पावसाळी सुट्टी संपत असून १ ऑक्टोबरपासून ताडोब्याचे सर्व दरवाजे उघडणार आहेत. मान्सून पर्यटनाला प्रतिसाद मिळाला असला तरी सततच्या पावसाने पर्यटकांची निराशा झाल्याचीही माहिती आहे.

जैविक विविधता, नैसर्गिक वारसा लाभलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीयस्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात या संरक्षित जंगलामध्ये भ्रमंती करणे कठीण असते. ताडोबा पावसाळ्याच्या कालावधीत अंशतः सुरू राहत असे. पण, मागील दोन वर्षांपासून ताडोबा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येत आहे. यंदाही कोअर झोन पूर्णपणे बंद तर बफरचे सात दरवाजे सुरू होते. त्याचे ऑनलाइन बुकींगदेखील सुरू होते.

राज्यात सर्वाधिक वाघांची नोंद ताडोब्यात आहे. त्यामुळे पर्यटकांची पहिली पसंती व्याघ्र पर्यटनात ताडोब्यालाच असते. यंदा मान्सून पर्यटनाला संपूर्ण मोसमात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे. आगरझरी व देवाडा या गेटला पर्यटकांवर पर्यटकांची गर्दीही झाली. पण, बऱ्याच वेळा पावसाने व्यत्यय आणल्याने या पर्यटकांना पर्यटनाचा आनंद या मोसमात घेता आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भासोबत राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्पही मंगळवारपासून सुरू होण्याचे संकेत आहेत.

गाइडचे ग्रेडिंग

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात गाइडचे ग्रेडिंग करून त्यांना स्टार दिले जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून याबाबतची प्रक्रिया राबविली आता सुरू झाली आहे.

उन्हाळ्याची चिंता मिटली

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नदी, नाले, जिवंत झरे, तलाव, दगडी बंधारे आणि सिमेंटचे पक्के बांध असे पाण्याचे नैसर्गिक व कृत्रिम स्त्रोत आहेत. तीव्र उन्हाळ्यात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत कमी होतात. यंदा उन्हाळ्यात पाणीसंकट निर्माण झाले होते. यंदा प्रकल्पातील जे पाणवठे कोरडे पडले त्याचे खोलीकरणही केले गेले. सुरुवातीला झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा सुरुवातीस झालेल्या दमदार पावसाने आत्ताच प्रकल्पातील तलाव, नदी, बंधारे, नाले, पाणवठे तुडुंब भरले असल्याने उन्हाळ्याची चिंता मिटली आहे.

कॅन्टरने सफारी १५ ऑक्टोबरपासून

यंदा बरसलेल्या दमदार पावसाने प्रकल्पातील काही रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे त्याचे दुरुस्तीचे काम केले जात आहे. परिणामी १ ऑक्टोबरपासून जिप्सीने पर्यटन करता येणार आहे. पण, कॅन्टरने सफारी बंद राहील. १५ ऑक्टोबरपासून कॅन्टरनेही पर्यटनाचा आनंद घेता येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.