नागपूर: बालसंरक्षणात कुठलीही हयगय केली जाणार नाही. जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेत असलेला समन्वयाचा अभाव दूर करण्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येणार आहे. मनुष्यबळाच्या कमतरतेवरही गांभीर्याने विचार करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बालकामगार यासारख्या अनिष्ठ प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या जनजागृतीची माहिती देण्यात आली. यावेळी अपर कामगार आयुक्त विजय पानबुडे उपस्थित होते.
बालकामगार प्रथेचे उच्चाटन करणे ही नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. या प्रथेविरुद्ध जनजागृती करण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयामार्फत जनजागृती अभियान हाती घेण्यात आले आहे. ७ नोव्हेंबरपासून या अभियानाला सुरूवात झाली असून विविध कार्यक्रम घेण्यात आले. ७ डिसेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. गुरुवारी मोमिनपुरा येथून सकाळी आठ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. यात ४०० शालेय विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे पानबुडे यांनी सांगितले. यासह चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी हसनबाग येथे जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. पार्डी नाका, मानेवाडा मार्ग, राणी दुर्गावती चौक, जुनी मंगळवारी, प्रतापनगर चौक या ठिकाणी पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.
चौकशी करणार
पारंपरिक व्यवसायात काम करणारी मुले बालकामगार म्हणून गणल्या जात नाही. मात्र विशिष्ट प्रकरणात तक्रार आल्यास त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे पानबुडे यांनी सांगितले. शिक्षा होण्याचे प्रमाण कमी आहे. रस्त्यांवर चौका चौकात भीक्षा मागणारी मुले दिसतात. बालकामगार कायद्यानुसार या प्रकरणात कारवाई केली जात नाही. मात्र बालसंक्षणातील विविध कायद्यांचा आधार घेऊन अशा घटना रोखण्यासाठी पावले उचलण्यात येत असल्याचे पानबुडे यांनी सांगितले.