सलमान खानच्या ‘राधे’ फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू.

सलमान खानच्या ‘राधे

बॉलिवूड सुपरस्टार ‘दबंग’ अभिनेता सलमान खान याची कोणतीही फिल्म असली, तरीही त्याच्या फिल्मसाठी सर्वांनाच उत्सुकता असते. प्रत्येक वर्षी ईदच्या दिवशी ‘दबंग’ अभिनेता सलमान खान त्याची फिल्म रिलीज करून त्याच्या चाहत्यांना भेट देतच असतो. यावर्षी सुद्धा ईदच्या दिवशी म्हणजेच येत्या १३ मे रोजी बहूचर्चित ‘राधे: योर मोस्ट वॉन्टेड’ ही फिल्म रिलीज होणार आहे. ही फिल्म रिलीज होण्यापूर्वीच प्रेक्षकांकडून कमालीची पसंती मिळतेय. फक्त भारतातच नव्हे तर इतर देशातही या फिल्मसाठीची उत्सुकता दिसून येतेय. या फिल्मसाठी आता परदेशात ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे.

एसके फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्टर शेअर करत ही माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी लिहिलंय, “फिल्म राधेसाठी मध्य पूर्व देशांमधून ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. यूएई, कतार, कुवेत, सौदी अरब आणि बेहरीन या देशांमधून फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे”. ही माहिती शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय, “सलमान खानच्या फिल्मसाठी ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे! तुम्ही तुमच्या जवळच्या सिनेमागृहाच्या वॉक्स सिनेमा, नोवो सिनेमा, रील सिनेमा आणि स्टार सिनेमा सारख्या वेबसाईटवरून तुमची सीट बुक करू शकता. सुरक्षित रहा!”

सध्या भारत देशावर सुरू असलेल्या करोना संकटामुळे भारतात ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज करण्याबाबत शंका असली तर इतर देशात मात्र ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी ही फिल्म थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नाही अशा राज्यांत मल्टीप्लॅटफॉर्मवर ही फिल्म रिलीज करण्यात येणार आहे.

प्रभूदेवा दिग्दर्शित ‘राधे’ या फिल्ममध्ये अभिनेता सलमान खान हा ९७ एनकाऊंटर्स केलेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दिशा पटानी सोबतची केमिस्ट्री देखील रंगलेली दिसणार आहे. सोबतच अभिनेता रणदीप हुड्डा आणि जॅकी श्रॉफ यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.