करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी ‘औषध बँक’; गरिबांसाठी ठरतेय वरदान

करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी 'औषध बँक' ; गरिबांसाठी ठरतेय वरदान

नागपूरः करोना विषाणू प्रादुर्भावामुळे सध्या अर्थकारणाची चाके ठप्प झाली आहेत. राज्यात गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे संपूर्ण आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे अर्थचक्राची गतीच मंद झाली आहे. नागपूरातील उद्योग, व्यापारापासून सर्वच अर्थकारण कुलुपात बंद झाल्याने हातावर पोट असणाऱ्या हजारो श्रमजीवींच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधिच गेल्या महिन्याभरापासून घरात दोन वेळची चूलही पेटणे मुश्किल झालेले असताना करोना विषाणूची बाधा झालेल्या गरिबांचे जीव औषधोपचारा अभावी धोक्यात आले आहेत. हे नैराश्याचे वातावरण असताना नागपूर सिटीझन फोरम ही स्वयंसेवी संस्था आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ग़रीब करोनाग्रस्तांसाठी आशेचा किरण बनत एक पाऊल पुढे आली आहे.

तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या संस्थेने उभी केलेली औषध बँक दारिद्र रेषेखालील करोनाग्रस्तांना जीवघेण्या आजारातून बाहेर काढण्यासाठी वरदान ठरत आहे. करोना प्रादुर्भावाच्या धास्तीने सध्या जीवनाश्यक वगळता सर्वच उद्योग, व्यापारी प्रतिष्ठानांना टाळे लागले आहे. त्याचा सर्वाधिक फटका हातावर पोट असलेले मजूर, कामगार, नोकरदार, श्रमजीवी, छोटे व्यावसायिक, कारागिरांना बसला आहे. वाहतूक व्यवस्थाही बंद असल्याने ऑटोचालक, रिक्षाचालकांपासून ते व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये नोकरदारी करणाऱ्यांची रोजीरोटी थांबली आहे.

शिवाय या टाळेबंदीमुळे अनेकांना नोकऱ्या देखील गमवाव्या लागल्याने घरात दोन वेळची चूल पेटणे देखील दुरापास्त झाले आहे. त्यात कुटुंबात करोनाचे संक्रमण झाल्यानंतर दुर्बल घटकातील या आजारग्रस्तांना उपचार करणे देखील अशक्य होत आहे. ही गरज ओळखून नागपूर सिटीझन फोरम या स्वयंसेवी संस्थेने दुर्बल घटकातील करोनाग्रस्तांसाठी औषध बँक सुरू केली. पाहता पाहता या संस्थेने आतापर्यंत शेकडो गरिबांकडून एक रुपया देखील न स्वीकारता त्यांना करोनाच्या संक्रमणातून बाहेर काढण्यासाठी लाखो रुपयांची औषधे अगदी मोफत उपलब्ध करून दिली आहेत.
सामाजिक जाणीव असलेल्या तरुणांच्या पुढाकारातून सुरू झालेली ही औषध बँक आर्थिक विवंचनेत सापडलेल्या गरिबांना उपचारा अभावी आलेल्या नैराश्यातून बाहेर काढण्यास आशेचा किरण दाखविणारी ठरली आहे.