‘पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास कंपन्यांवर कारवाई’

पदवी

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्र्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर सरकार तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवर बरेच आरोप झाले. परीक्षा घेणारच नाही असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. केवळ आताची स्थिती लक्षात घेता सध्या पदवी देऊ व ज्यांना गुणसुधार करायचा आहे, त्यांची नंतर परीक्षा घेऊन अशी आमची भूमिका होती. मी परीक्षा न घेण्याच्या माझ्या मतावर आजही ठाम आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे हे कर्तव्यच असून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे सामंत यांनी सांगितले.