नागपूर : पोल्ट्रीफार्म संचालकाने इतवारीतील एका सोयाबीन व्यापाऱ्याची ४३.४२ लाख रुपयाने फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. तहसील पोलिसांनी कोराडी मार्ग येथील रहिवासी राकेश सिंह या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. पोल्ट्रीफार्म बंद करून फरार झाल्यानंतर राकेश सिंहचा गुन्हा उघडकीस आला.
वर्धमाननगर निवासी तुलसी आसवानी यांचे इतवारी धान्य बाजारात दुकान आहे. त्यांचा सोयाबीन तेल व कोंबड्यांच्या दाण्यांचा व्यवसाय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नोव्हेंबर २०१६ साली सीए रोड निवासी दलाल रंगराज गेचुडेने आसवानी यांची राकेश सिंहशी ओळख करून दिली. आरोपी राकेशचा कळमेश्वर येथे पोल्ट्री फार्म आहे. आसवानी २९ नोव्हेंबर २०१६ पासून राकेश सिंहच्या पोल्ट्रीफार्मवर कोंबड्यांच्या दाण्यांचा पुरवठा करीत होते. त्यांनी वेळोवेळी एका कोटी रुपयांपर्यंत मालाचा पुरवठा केला. हा व्यवहार उधारीत असल्याने राकेश वेगवेगळ्या वेळी हा पैसा देत होता.
५ नोव्हेंबर २०१९ रोजी आसवानी यांची राकेशवरील उधारी ४३.४२ लाखांवर पोहचली. त्यामुळे त्यांनी राकेशकडे पैशांची मागणी केली. मात्र आरोपी पैसा देण्यास टाळाटाळ करीत होता. मार्च महिन्यात लॉकडाउन लागल्यानंतर त्याने फोनवर प्रतिसाद देणेही बंद केले. पैशांच्या मागणीसाठी आसवानी आरोपीच्या पोल्ट्रीफार्मवर गेले तेव्हा ते बंद झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आसवानी यांनी तहसील पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.