डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने महाविद्यालयासाठी हवी १०० एकर जागा

महाविद्यालय

नागपूर : दीक्षाभूमी परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा दिवसेंदिवस विस्तार होत असल्याने सध्याची जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या विस्तारासाठी राज्य सरकारने १०० एकर जागा उपलब्ध करावी, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या धम्मचक्र प्रवर्तनाच्या क्रांतीमुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी लाखो अनुयायी येथे येतात व अभिवादन करतात. परिसरात असलेल्या डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचीसुद्धा नामवंत कॉलेज म्हणून ओळख आहे. महाविद्यालयात कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसह पदवी, पदव्युत्तर अभ्यास तसेच एमबीए, एलएलबी व इतर अनेक पदविका अभ्यासक्रमसुद्धा आहेत. सध्या ३ हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दीक्षाभूमीचा परिसर असल्याने महाविद्यालयाच्या विस्तारावर मर्यादा आल्या आहेत. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेले जिम, खेळांचे मैदान, प्रयोगशाळा, ग्रंथालये, सभागृह, इनडोअर स्टेडियमसारख्या सुविधा विद्यार्थ्यांना देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे नागपूरच्या परिसरात १०० एकर जागा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी केली आहे. स्वतंत्र जागा मिळाल्यास या महाविद्यालयाचे रूपांतर डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्याचा मानस आहे. महाविद्यालयाला नॅकने ए प्लसचा दर्जा दिलेला आहे. हा दर्जा टिकविण्यासाठी जागेची आवश्यकता आहे. यामुळे सध्या दीक्षाभूमी परिसरातील सर्व अभ्यासक्रम तेथे स्थानांतरित करण्यात येतील. यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुविधा प्राप्त होईल व दीक्षाभूमी परिसराच्या विकासालासुद्धा हातभार लागेल. दीक्षाभूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधनावर अभ्यास करणे, बौद्ध संस्कृतीचा अभ्यास करणे, पाली भाषेचे संशोधन व डॉ. आंबेडकर अ‍ॅम्फीथिएटर तयार करून येणाऱ्या अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या फिल्म दाखविणे शक्य होईल. स्मारक समितीच्या ताब्यात असलेल्या १४ एकर जागेचा वापर दीक्षाभूमीच्या कार्यासाठी करून महाविद्यालय दुसरीकडे नेण्याची आवश्यकता आहे. १०० एकर जागा ९९ वर्षांच्या लीजवर राज्य सरकारने द्यावी, अशी मागणी गजघाटे यांनी केली आहे.