नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील चहापाण्याच्या खर्चाचा घोटाळा बाहेर येताच विद्यापीठातील विविध विभागांकडून आगाऊ रक्कम मागणीला अचानक ब्रेक लागला आहे. गेल्या महिनाभरात कोणत्याच विभागाने चहाखर्चासाठी पैसे मागितले नसल्याची माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
अभ्यास मंडळातील तीन सदस्यांनी एका दिवसात ९९ कप चहा व २५ कप कॉफी घेतल्याचे वृत्त आले होते. त्याची दखल घेत कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी चौकशी समिती स्थापन केली. चौकशी समितीने पहिल्याच बैठकीत विद्याशाखा विभागातील गेल्या काही महिन्यात झालेल्या बैठकांचे ५० देयके सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. त्या देयकांमुळे आता नेमका किती आगाऊ देण्यात आला आणि त्यापैकी किती खर्च झाला ते स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, चहापाण्याच्या खर्चाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे कळताच विद्यापीठातील इतर विभागदेखील हादरले आहेत. तसेच वित्त विभागानेदेखील प्रत्येक विभागाला आजवर घेतलेला अॅडव्हान्स आणि त्यातून झालेल्या खर्चाचे देयकासह तपशील सादर करण्याचा आदेश दिला. अॅडव्हान्स रक्कमेच्या खर्चाचे हिशेब सादर न केल्यास नवा अॅडव्हान्स देण्यात येणार नाही, असेही अंतर्गत आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक विभागांचे धाबे दणाणले आहेत.
विद्यापीठात परीक्षा, विद्याशाखा, सामान्य प्रशासन, गोपनीय विभाग कार्यरत आहेत. तिथे विविध समित्यांच्या बैठकी आणि सभादेखील होत असतात. वित्त विभागाकडून देण्यात आलेल्या रक्कमेचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती वित्त विभागातील अधिकाऱ्याने दिली. त्यामुळेच आता विभागांकडून घेण्यात आलेले रक्कमेचे हिशेब सादर होईस्तोवर नवीन रक्कम देण्यात येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, गेल्या महिनाभरात कोणत्याच विभागाने बैठकांच्या नियोजनासाठी पैसे मागितले नसून त्यामुळे खर्चावर एकप्रकारचे नियंत्रणच आले आहे, असेही त्या अधिकाऱ्याने नमूद केले.
अधिक वाचा: कैफे कॉफी डे के संस्थापक सोमवार रात से लापता