नागपुर :- राज्यात कुठेही विजेच्या धक्का लागून जखमी झाल्यास राज्य सरकारकडून उपचाराचा खर्च देण्यात येणार आहे, अशी घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत केली. खेड-आळंदीचे आमदार सुरेश गोरे यांनी दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही घोषणा केली.
खेड मतदारसंघातील रोहकल या गावी दुचाकीवर जाणाऱ्या आई व मुलाच्या अंगावर वीजवाहक तार पडल्याने ते जखमी झाले होते. याप्रकरणी महावितरणच्या भोंगळ कारभारासंदर्भात गोरे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. यावर बावनकुळे यांनी सांगितले, की या घटनेनंतर तार जोडणीच्या अभियंत्याला निलंबित करण्यात आले आहे. तसेच जखमींना महावितरणने तातडीची मदत दिल्ली आहे. विजेच्या धक्क्याने जे व्यक्ती मृत्यूमुखी पडतात, अशा व्यक्तींच्या कुटुंबीयांना सरकारकडून ४ लाख रूपयांची नुकसानभरपाई देण्यात येते. ही भरपाई देण्यात पूर्वी उशीर लागत होता. पण आता मदत मिळण्यासाठी सुलभ प्रक्रिया केली आहे.
बावनकुळे पुढे म्हणाले, की कधी-कधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून शेतकऱ्यांची पिके जळून खाक होण्याच्या घटनाही घडतात. त्याची भरपाईही लवकर देण्याबाबत पावले उचलण्यात येणार आहेत. राज्यात जुने विद्युत खांब, तार व यंत्रणा याची गेल्या तीस वर्षापासून देखभाल दुरुस्ती झालेली नाही. त्याकरिता राज्य सरकारकड़े ७ हजार ३०० कोटींचा आराखडा तयार असून त्याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल अशी त्यानी ग्वाही दिली.