महात्मा फुले मार्केट होणार शिफ्ट ?

mahatma_phule_market
नागपुर :- सीताबर्डी येथील मुंजे चौकातील महात्मा फुले मार्केट (नेताजी फुले मार्केट) हे मौजा बाबुलखेडा येथील मनपाच्या विस्तारीत जागेमध्ये स्थानांतरणासाठी नागपूर महानगरपालिका पुढाकार घेत आहे. यासंदर्भातील आढावा बैठक आमदार सुधाकर कोहळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीत आयोजित करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, आयुक्त वीरेंद्र सिंह, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (बाजार विभाग) विजय हुमणे, धंतोली झोन सहायक आयुक्त स्मिता काळे, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
नेताजी फुले मार्केट हे सीताबर्डी मुंजे चौकात स्थित आहे. मुंजे चौकात मेट्रो रेल्वेच्या विस्तारीत कामामध्ये नेताजी मार्केट हलविण्यात येत आहे. हे मार्केट मौजा बाबुलखेडा मनपाच्या मालकीच्या विस्तारीत जागेत स्थानांतरण करण्याचा विषयावर बैठकीत चर्चा झाली. मार्केटकरिता राखीव असलेली दोन एकर जागा फूल विक्रेत्यांना व व्यापाऱ्यांना ९९ वर्षांकरिता लीजवर उपलब्ध करून देण्याचा प्रस्तावावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला महात्मा फुले पुष्प उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष जयंत रणनवरे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कोढे, उपअभियंता शकील नियाजी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.