नवी दिल्ली : काही नवीन मार्गदर्शक तत्वांचे पालन न केल्याने ट्विटरच्या अडचणीत वाढ होत आहे. दरम्यान काल (दि. ३०) ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी हा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षा आयोगाच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवण्यात आले आहे.
दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ट्विटरविरूद्ध हा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ट्विटरच्या मायक्रो-ब्लॉगिंग साईटवर मुलांच्या अश्लील सामग्री शेअर केल्या जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. एनसीपीसीआरने याबाबत सायबर सेलकडे तक्रार दाखल केली होती.
ट्विटरवर पोस्को अॅक्ट आणि आयटी कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीपीसीआरने लिहिलेल्या या पत्रांपैकी एक सायबर सेलला आणि दुसरे पत्र दिल्ली पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील मुस्लिम व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणाच्या व्हिडीओचे सादरीकरण करून जातीय सौहार्द बिघडवल्याकारणी पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या एमडींना कायदेशीर नोटीस पाठविली होती. भारतातील ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी यांना ही नोटीस पाठवली होती. या प्रकरणी ट्विटरच्या एमडींनी उत्तर प्रदेशच्या लोणी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.