मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधतील. कालच लॉकडाउन वाढण्याची घोषणा करण्याता आली आहे. त्यामुळे भविष्यातील राज्याची दिशा कशी असेल?, लसीकरण आणि अर्थव्यवस्थेला चालना कशी देणार? त्या दृष्टीने मुख्यमंत्री बोलतील अशी अपेक्षा आहे.
कोरोनाचा कहर सुरु असल्यामुळे राज्यात सध्या लॉकडाउन सुरु आहे. आज लॉकडाउनचा पहिला टप्पा संपत असताना आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलाय. लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या कमी झालेली नसली, तरी मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरात रुग्णसंख्या स्थिरावल्याचे दिसते. त्यामुळे लॉकडाउनचे परिणाम आणखी दोन आठवड्यात दिसू शकतात.
या काळात उद्योग-व्यवसाय बंद असल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान होतेय. राज्य सरकारने काही घटकांसाठी मदत जाहीर केली आहे. पण ती अत्यल्प आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात कोरोनाचा फैलाव रोखताना अर्थव्यवस्थेचं चाक सुद्धा रुतणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने उद्धव ठाकरे काय बोलतात? याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.