एरंडोल (जळगाव) : मुलाला शाळेत घेवून जाताना अपघात झाला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले. ट्रकच्या चाकाखालून मायलेकांचे मृतदेह बाहेर काढले. ग्रामीण रुग्णालयात दोघांच्या प्रेतांची तपासणी केल्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मायलेकाची अंत्ययात्रा एकाचवेळी घरातून निघाल्याने सारा परिसर नागरिक भावनाविवश झाला होता.
शाळेत जाण्यासाठी निघालेल्या शिक्षिकेने पंपावर जावून दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. येथून निघून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. यात शिक्षिका आणि त्यांच्या नऊ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक ट्रक सोडून फरार झाला. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे अत्यंत संथगतीने सुरु असल्यामुळे निष्पाप मायलेकाला प्राण गमवावे लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सकाळी शाळेत जाण्यासाठी निघालेल्या कविता चौधरींनी दुचाकीत पेट्रोल भरले आणि काही क्षणातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांचे पती कनाशी येथे शिक्षक असून ते देखील शाळेत गेले होते. त्यांचे भाऊ ऋषिकेश चौधरी यांनी त्यांना घटनेची माहिती दिली.
धाडकन आवाज आला अन्
नविन बसस्थानकासमोरील विद्यानगरमधील रहिवासी कविता कृष्णकांत चौधरी (वय 35) ह्या मुलगा लावण्य कृष्णकांत चौधरी (वय 9) यास बरोबर घेवून दुचाकी गाडी (क्र. एमएच 19 डी.बी.8779) चंदनबर्डी (ता. एरंडोल) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जात होत्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना त्यांच्या दुचाकीस ट्रक (क्र. जी.जे.26 टी.8264) ने धडक दिल्यामुळे मायलेक महामार्गावर पडले आणि त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर ट्रकच्या धडकेत महिला व मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समजताच नागरिकांनी अपघातस्थळी गर्दी केली. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, हवालदार संदीप सातपुते, अनिल पाटील, पंकज पाटील हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने ट्रकच्या चाकाखालून मायलेकांचे मृतदेह बाहेर काढले आणि ग्रामीण रुग्णालयात नेले.
विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित
मायलेकाची अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्यामुळे उपस्थित नागरिक भावनाविवश झाले होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शिक्षिका कविता चौधरी विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून परिचित होत्या. चंदनपुरी येथील आदिवासी वस्तीत शाळा असल्यामुळे आणि शाळेतील सर्व विद्यार्थी आदिवासी समाजाचे असल्याने विद्यार्थ्याना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, यासठी त्यांनी स्वखर्चाने शाळेत ॲक्वा बसविले होते. तसेच शाळेत विद्यार्थ्यांसाठी हात धुण्यासाठी साबण आणि डोक्याला लावण्यासाठी तेल स्वखर्चाने आणत होत्या. शाळेची इमारत त्यांनी शैक्षणिक उपक्रमांद्वारे बोलकी केली होती.