प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते म्हणून वडिलांनीच केली आपल्या मुलीची हत्या

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहते म्हणून वडिलांनीच केली आपल्या मुलीची हत्या

जयपूर: राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ऑनर किलिंगची (Honour Killing) एक घटना समोर आली आहे. इथे आपल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये (Live-in relationship) राहाणाऱ्या एका मुलीची तिच्या वडिलांनीच हत्या केली आहे. यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात जात पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. मुख्य बाब म्हणजे मुलीनं याप्रकरणी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. न्यायालयानं पोलिसांना या मुलीला सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, असं झालं नाही आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येची शिकार झालेली पिंकी सैनी दौसा शहरातील रामकुंड परिसरातील रहिवासी होती. तिचं रोशन महावर नावाच्या एका दलित मुलावर प्रेम होतं. १६ फेब्रुवारीला कुटुंबीयांनी तिचं लग्न जबरदस्ती लालसोट क्षेत्रातील एका गावात करून दिलं होतं. मात्र, लग्नानंतर २१ फेब्रुवारीला पिंकी आपल्या प्रियकरासोबत फरार झाली आणि तिनं थेट उच्च न्यायलय गाठलं. रोशननं पिंकीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं. यासोबतच कुटुंबीयांवर जबरदस्तीनं लग्न लावल्याचा आरोप करण्यात आला.

राजस्थान उच्च न्यायालयानं दौसा आणि जयपूरच्या अशोक नगर पोलिसांना पिंकी सैनी आणि रोशन महावर यांनी सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले. १ मार्चला पिंकी झालरा येथील रोशनच्या घरी गेली. याच दरम्यान पिंकीचे कुटुंबीय त्याठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी तोडफोड करत ते पिंकीला आपल्यासोबत घेऊन गेले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पिंकी सैनीचा तपास सुरू केला, मात्र त्यांना ती सापडली नाही. यानंतर बुधवारी रात्री पोलिसांना अशी माहिती मिळाली, की पिंकीची हत्या करण्यात आली आहे. यानंतर पोलीस पिंकीच्या वडिलांच्या रामकुंड येथील घरी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधिकारीही त्याठिकाणी पोहोचले. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे, मात्र पोलिसांच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.