नागपूर : नागपुरातील एका खाजगी सुरक्षा रक्षकाने 24 लाख रुपयांची भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन करत आपला प्रामाणिकपणा तसंच सामाजिक बांधिलकी दाखविली. 24 लाखांची बॅग त्याला रस्त्यावर मिळाली होती.
मनात आणलं असतं तर त्याने ती गोष्ट कुठेही उघड केली नसती .पण आपल्यामधला प्रामाणिकपणा जिवंत ठेवत त्याने पैशांनी भरलेली बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. पोलिसांनी सुद्धा त्याच्या इमानदारीला सलाम करत त्याचा सत्कार केला.
रस्त्यावर सापडलेले शंभर रुपये कुणी परत करत नाहीत. मात्र नागपुरातील खासगी सुरक्षा रक्षकांनी रस्त्यावर सापडलेली 24 लाखांची रोकड भरलेली ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन करून एक नवा आदर्श घालून दिला. युवराज सदाशिव चामट असे या प्रामाणिक सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.
यावेळी युवराजसोबत गणेश चतुरकर, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले हे देखील गार्ड उपस्थित होते. मात्र बॅगमध्ये काय असेल या भीतीने कुणीही त्या बॅग जवळ गेलं नाही, मात्र युवराज यांनी धाडस दाखवत बॅग उघडून बघितली तेव्हा ती बॅग नोटांच्या बंडलांनी भरलेली होती.
त्यानंतर युवराज यांनी क्षणाचाही विचार न करता थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठून ती बॅग पोलिसांच्या स्वाधीन केली. ही घटना नागपूर शहरातील मुंजे चौकात घडली. पोलिसांनाही युवराजचा प्रामाणिकपणा भावला. त्यानंतर आज (बुधवार) पोलीस उपायुक्त विनिता साहू यांच्या हस्ते युवराज यांच्यासह अन्य तिघांचा सत्कार करत त्यांच्या कर्तृत्वाचा सत्कार केला.
युवराज हा सामान्य सुरक्षा रक्षक आहे. मात्र त्याचा प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे, अशा शब्दात पोलीस अधिकाऱ्यांनी युवराजचं कौतुक केलं तसंच त्याचा सत्कार केला. पोलिसांच्या सत्काराने युवराजही भारावून गेला.
आजच्या धावपळीच्या युगात कोणाचं भान कोणाला नसतं. मात्र अश्यायातही माणुसकी आणि इमानदारी जपत आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या या सुरक्षा रक्षकाचं नागपुरच्या नाक्यानाक्यावर सर्वत्र कौतुक होत आहे.