ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांचे करोनाने निधन

Date:

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पटेल हे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार होते. गांधी कुटुंबाचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात ख्याती होती.

शरीरातील बहुतांश अवयव निकामी झाल्याने बुधवारी पहाटे तीन वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विटद्वारे दिली.’अत्यंत दुःखद मनाने कळविण्यात येतेय की माझे वडील अहमद पटेल यांचे आज पहाटे ३:३० वाजता निधन झाले आहे. महिनाभरापूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. परंतु त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही आणि बहुतांश अवयव निकामी झाल्याने तब्येत खालावली होती. अल्ला त्यांना जन्नतुल फिरदौस प्रदान करो. मी त्यांच्या शुभचिंतकांना करोनाशी संबंधित कायदा-सुव्यवस्था नियमांचे पालन करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याची विनंती करतो.’

अहमद पटेल यांना १ ऑक्टोबर रोजी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्लीजवळच्या गुरगाव येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु १५ नोव्हेंबर रोजी प्रकृती खालावल्याने पटेल यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शोक व्यक्त केलं आहे.

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related