नागपूर : शहर पोलिसातील २,२५० कर्मचाऱ्यांची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदोन्नती केल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याला निर्धारित वेळी पदोन्नती देण्यासाठी शासनाने मापदंड ठरविले आहेत. त्यानुसार नियुक्तीला १० वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना शिपाई पदावर, नायक शिपायाच्या पदावर २० वर्षे तसेच हवालदाराच्या पदावर ३० वर्षे पूर्ण करणाऱ्यांना पदोन्नती देण्यात येते. ५ मार्च २०१९ रोजी सातव्या वेतन आयोगात आश्वासन दिलेल्या प्रगती योजनेंतर्गत कालबद्ध पदोन्नती देण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शुक्रवारी २,२५० कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. त्यांनी ३१२ हवालदारांना सहायक उपनिरीक्षक, ६२३ नायक यांना हवालदार आणि १ हजार शिपायांना नायक पदावर पदोन्नती दिली. त्याचप्रमाणे ३१५ सहायक उपनिरीक्षकांना सातव्या वेतन आयोगाच्या प्रगती योजनेचा तिसरा लाभ देण्यात आला आहे. पूर्वी १२, २४ आणि ३६ वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार पदोन्नती देण्यात येत होती. त्यामुळे सामान्य वर्गातील अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावरही सहायक उपनिरीक्षक होऊ शकत नव्हते. शहर पोलिसात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली आहे. पोलीस आयुक्तांच्या भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांचे आभार मानले आहेत. शहर पोलिसांची कमान सांभाळल्यानंतर अमितेश कुमार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.