नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार

मेट्रो रेल्वे

नागपूर : राज्य शासनाच्या मिशन बिगेन अगेन अंतर्गत राज्यातील मेट्रो रेल्वे सेवा सुरळीत होणार आहे. नागपुरात मेट्रो रेल्वे सेवा तिकीट दरात ५० टक्के कपातीसह शुक्रवारपासून सुरू होणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक (ऑपरेशन व मेंटेनन्स) सुधाकर उराडे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.

रिच-३ अंतर्गत सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनदरम्यान अ‍ॅक्वा मार्गावर शुक्रवार १६ ऑक्टोबरपासून आणि रविवार १८ ऑक्टोबरपासून रिच-१ मध्ये ऑरेंज मार्गावर सीताबर्डी इंटरचेंज ते खापरी मेट्रो स्टेशनदरम्यान सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू होणार आहे. महामेट्रोतर्फे सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निजंर्तुकीकरण करण्यात येईल.

मेट्रोचे कर्मचारी हॅण्डग्लोव्ह , मास्क परिधान करून असतील. या शिवाय बेबी केअर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येईल. याचप्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेकरिता महामेट्रो सर्व प्रकारची काळजी घेणार आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांचा विश्वास नक्कीच वाढेल. मेट्रो प्रवाशांनीदेखील सहप्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये, याकरिता या सर्व सूचना तसेच मानकांचे पालन करावे, असे उराडे यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेत महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (कॉपोर्रेट कम्युनिकेशन) अखिलेश हळवे उपस्थित होते.