नागपूर : अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. ११० वर्षांच्या वर या पुलाचे आयुष्य झाले आहे. १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र पाठवून या पुलाचे आयुष्य संपल्याची माहिती दिली. परंतु अद्यापही दुसरा पूल तयार न केल्यामुळे या पुलावर कधी अपघात होईल याची शाश्वती नाही.
अजनी रेल्वे पूल हा पूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी महत्त्वाचा पूल होता. परंतु मानेवाडा, बेसा, हुडकेश्वर परिसरात नागरिकांची संख्या वाढल्यामुळे या पुलावरून जाणाºया वाहनांमध्ये वाढ झाली. पुलाला १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर इंग्रजांनी रेल्वेला पत्र लिहून त्वरित पर्यायी व्यवस्था करण्याची सूचना केली. परंतु रेल्वे तसेच महानगरपालिकेच्या वतीने तात्पुरती डागडुजी करून हा पूल वाहतुकीसाठी सुरू आहे. त्यामुळे हा पूल कधीही कोसळण्याची भीती अनेकांनी यापूर्वी व्यक्त केली आहे. पुलाच्या खालील भागाची डागडुजी रेल्वेच्या वतीने तर वरील भागाची काळजी महानगरपालिकेतर्फे घेण्यात येते. तात्पुरती काळजी घेतल्यामुळे प्रश्न सुटणार नसून नवा पूल तयार करण्याची मागणी होत आहे.
अजनी रेल्वे पूल खूप जुना आहे. वरील भागाची काळजी महापालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत आम्ही पुलाची काळजी घेत आहोत.
लीना उपाध्ये, मुख्य अभियंता महापालिका
अजनी रेल्वे पुलावर कधीही अपघात होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे गाड्यांची वाहतूक बंद पडू शकते. रेल्वेने पाठपुरावा करून महापालिका आणि राज्य शासनाच्या वतीने कारवाई करण्याची गरज आहे.
हबीब खान, कार्यकारी अध्यक्ष, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन
अजनी रेल्वे पुलाची रेल्वेच्या वतीने नियमित देखभाल करण्यात येते. सध्या पुलाची परिस्थिती चांगली आहे. गरज भासल्यास आम्ही पुलाची डागडुजी करतो.
एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग