नागपूर : ६६ वर्षीय ओमानाम्मा फारच संकोचून जातात जेव्हा लोक त्यांना विचारतात की, व्हिडिओमध्ये तुम्ही एवढ्या गंभीर का असता.. त्यावर त्यांचे एकच माफक उत्तर असते की, मला कुठलेही काम करताना विनाकारण हंसत राहणे आवडत नाही..
या आहेत, १८० व्हिडिओजमध्ये काम केलेल्या, केरळमधील पथ्थनमथिट्टा गावच्या ओमाना अम्मा.. यू ट्यूबवर सध्या सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या ‘व्हिलेज कुकींग-केरळ’ या चॅनेलच्या प्रमुख कलाकार..
केरळी पद्धतीची गुंडाळलेली लुंगी त्यावर ओढलेले एक वस्त्र किंवा नेसलेली दाक्षिणात्य साडी, केसांचा मागे बांधलेला लहानसा बुचडा, हातात लाकडी मुठीचा लोखंडी मोठा चाकू आणि चेहऱ्यावर कमालीचे गंभीर भाव.. अशा पेहरावातील ओमाना अम्मा जेव्हा पदार्थ बनवायला हाती घेतात तेव्हा त्या जणु एक अत्त्युच्च कलाकृती सादर करत असल्यासारख्याच भासतात.
जुने ते सोने या धर्तीवर पारंपारिक खाद्यपदार्थांवर अधिक भर देण्याचा ट्रेंड काही काळापासून सोशल मिडियावर अधिराज्य गाजवताना दिसतो आहे. आजी-पणजीच्या काळातील खाद्यसंस्कृतीचा शोध घेऊन तो पुढच्या पिढीच्या हाती सोपविला जातो आहे. यातच व्हिलेज कुकींग केरला या यू ट्यूब चॅनेलने अवघ्या तीन वर्षात जग पादाक्रांत केल्याने त्यात प्रमुख भूमिका असलेल्या ओमानाअम्मा जगप्रसिद्ध व्यक्ती बनल्या आहेत.
१९१७ साली अमजित एस व अभिजित एस या दोन जुळ्या भावंडांनी या चॅनेलची सुरुवात केली. यातील अभिजित यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी घेतली आहे. केरळमधील पारंपारिक व ग्रामीण भागातील पदार्थांची जगाला ओळख करून देणे हा त्यामागचा हेतू.
केरळमधल्या रान्नी या शहरापासून १५ कि.मी. दूर असलेल्या पोथुपारा या लहानशा खेड्यात व्हिलेज कुकींग केरलाचे शूटींग होत असते. मातीच्या भांड्यात चुलीवर शिजवलेले पदार्थ पाहताना त्याविषयीची खात्री पाहणाऱ्याच्या मनात नकळतच तयार होत जाते.
ओमाना अम्मांविषयी बोलताना अमजित सांगतात, त्या आमच्या नात्यात आहेत. हे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांना विचारले तेव्हा त्या फार अवघडल्या होत्या. बराच काळानंतर त्या आता व्हिडिओ शूटमध्ये सहजतेने वावरतात. त्यांना इतर निवेदकांसारखे हंसत हंसत व लांबलचक बोलायला आवडत नाही. त्यांना मनापासून काम करणे आवडते. त्यांचे तसे नैसर्गिक असणेच मग आम्ही कायम ठेवले आणि त्याचमुळे त्या जगभरात लोकप्रियही ठरल्या.
ओमाना अम्मांचा चाकू
ओमाना अम्मा यांच्या हातात असलेला चाकू हा त्यांच्यासाठी अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या २४ वर्षांपासून तो त्यांच्याजवळ आहे. त्याची धार अजिबात कमी झालेली नाही वा तो खराबही झाला नाही असं त्या सांगतात. त्यांच्यासोबत ज्या इतर स्त्रियांनी तो घेतला त्या सर्वांचे चाकू आता खराब झालेत किंवा टाकून द्यावे लागले आहेत. ओमाना अम्मांचा चाकू मात्र जसाच्या तसाच आहे. त्या चाकूने त्या सोलणे, चिरणे अशी सर्वच कामे करू शकतात. त्यांच्या हातातून कुठलीही भाजी चिरताना पाहणे हा एक वेगळ्याच आनंदाचा भाग असतो. अतिशय कुशलतेने त्या भाजी चिरत असतात.
पारंपारिक केरळी खाद्यपदार्थांचा समावेश
डोसा इडली वा सांबार यापलिकडे असणारे, अतिशय चविष्ट असे अनेक केरळी पदार्थ आहेत. ज्यात थोरन, वेगवेगळ्या चटण्या, लोणची, भाज्या, तळणीचे पदार्थ, स्नॅक्स, गोड पदार्थ यांचा समावेश होतो. या चॅनेलवर हे सर्व पदार्थ पहाता येतील.