नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोविड-१९च्या चाचणीसाठी चीनहून मागवलेल्या रॅपिड टेस्ट किटच्या वापरावर बंदी घातली आहे. राजस्थानात याद्वारे ९५% पर्यंत चुकीचे निष्कर्ष आले होते. आयसीएमआरच्या ८ संस्थांतील पथके दोन दिवस या किटची प्रत्यक्ष तपासणी, चाचणी करतील. यात हे किट खराब आढळले तर त्यांना परत पाठवण्यात येईल. आयसीएमआरने चीनच्या गुआंगझू वाँडफो बायोटेक आणि जुहाई लिवजोन डायग्नोस्टिक्स या दोन कंपन्यांकडून ५ लाख किट मागवले होते.
आयसीएमआरचे मुख्य संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, किटमध्ये गडबड असल्याची माहिती आम्हाला तीन राज्यांकडून मिळाली. त्यांच्या निष्कर्षात खूप फरक पडला. काही ठिकाणी तर ६ ते ७१% पर्यंत आहे. त्यामुळे दोन दिवस या किटचा वापर करू नये, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. आयसीएमआरने खराब किट पाठल्याचा आरोप सर्वप्रथम प. बंगालने केला होता.
ममता सरकारने केंद्रीय पथकांना हॉटेलात रोखले, वाद वाढल्यानंतर सायंकाळी बाहेर जाऊ दिले
कोलकाता | कोरोना महामारीविरुद्ध देशाच्या लढाईला आता राजकीय विषाणूची बाधा होऊ लागली आहे. लॉकडाऊन आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायोजनेवर नजर ठेवण्यासाठी प. बंगालमध्ये दोन केंद्रीय पथके पाठवण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी म्हटले की, राज्य सरकार कोलकाता आणि जलपायगुडी येथे गेलेल्या पथकांना हॉटेलमधून बाहेर पडू दिले नाही. तर तृणमूल काँग्रेसने म्हटले की, केंद्रीय पथके साहसी पर्यटनासाठी आली आहेत. ममता यांनी सोमवारी म्हटले होते की, केंद्रीय पथके पाठवण्याचा ठोस आधार पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांनी सांगितला नाही तर राज्य सहकार्य करणार नाही. दिवसभराच्या आरोप-प्रत्यारोपानंतर सायंकाळी साडेचार वाजता केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ दिले.
केंद्राचे निर्देश : राज्य सरकारने योग्य व्यवस्था करावी
केंद्रीय पथकाच्या कामात अडथळ्यांवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी प. बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना पत्र पाठवले. ते म्हणाले की, राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकांसाठी योग्य व्यवस्था करावी. त्यांना दौरा, आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटणे आणि वास्तव स्थितीचा आढावा घेण्यापासून रोखण्यात येत आहे. हे सर्व आपत्कालीन प्रतिबंधक कायदा, २००५ नुसार आदेश लागू करण्यात अडथळा मानले जाईल.
राज्यांतील अधिकाऱ्यांचे सहकार्य नाही : पथक प्रमुख
प. बंगालमध्ये आलेल्या पथकाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, बंगालमध्ये दाखल झाल्यापासून मी सहकार्यासाठी मुख्य सचिवांच्या संपर्कात आहे. आज सांगण्यात आले की बाहेर कोठेही जायचे नाही. आम्ही राज्यातील अधिकाऱ्यांसोबतच बाहेर जाऊ. मात्र, सायंकाळी पथकाला बाहेर जाऊ दिले.
पथकांनी जास्त रुग्णांच्या राज्यांत जायला हवे : तृणमूल
तृणमूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी केंद्रीय पथकाचा दौरा साहसी पर्यटन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विचारणा केली की, ही पथके गुजरात, उत्तर प्रदेशसह जेथे जास्त रुग्ण आणि हॉटस्पॉट आहेत तेथे का गेली नाहीत. बंगालमध्ये सध्या ३५९ रुग्ण आहेत.
Also Read- नागपूर : आणखी ७ जणांना कोरोनाची लागण, रूग्णांची संख्या ८८ वर