नागपूर: करोनाच्या विळख्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या उपराजधानीसाठी बुधवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या तीन ठिकाणी तपासलेल्या एकूण १७९ नमुन्यांपैकी यवतमाळ येथील एक पॉझिटिव्ह वगळता नागपुरातील सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.
दिवसभरात सर्वच नमुने निगेटिव्ह आल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपूरासाठी हा बहुधा पहिलाच प्रसंग ठरला आहे. त्यामुळे करोनाच्या प्रादुर्भावामुळे अस्वस्थ झालेल्या नागपूरकरांनी गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच समधानाचा श्वास घेतला. शहरात गेल्या शहरात गेल्या पाच दिवसांत ३७ रुग्ण आढळले आहेत. यातील २९ रुग्ण हे १२ ते १४ एप्रिल या तीन दिवसांमधील आहेत. त्यामुळे आरोग्य विभागच नव्हे तर अख्ख्या उपराजधानीचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, बुधवारने शहरवासीयांना दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह आढळत असलेले बहुतांश रुग्ण हे करोनाची लागण झालेल्यांच्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या सहवासात आल्याने त्यांना लागण झाली आहे. यातील अनेक जण संस्थात्मक एकांतवास कक्षात ठेवण्यात आले होते.
नवीन नऊ संशयित दाखल
या घडामोडीत करोनासदृश आजाराची लक्षणे आढळल्याने मेडिकलमध्ये चार, आणि मेयोत पाच असे नऊ संशयित उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तातडीने तपासणीला पाठवण्यात आले. या घडामोडीत मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात दिवसभरात तब्बल ९२ जणांची तपासणी केली गेली.