पॉझिटिव्ह न्यूज: मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत होतेय घट

Corona Kit

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. काल करोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील करोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता. पालिकेने रुग्णांच्या टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. काल बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे. काल मुंबईत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्याशिवाय एका ५० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. काल मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातली करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टक्क्याने कमी होता. त्याशिवाय काल दिवसभरात राज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसातील ही संख्याही सर्वात कमी आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढून २९१६ झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्यांपैकी राज्यातील ५० लोकांना करोना झाला आहे. त्यात मुंबईतल्या १४ जणांचा समावेश आहे.

राज्यात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार केवळ एका दिवसात ७६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. संपर्कातून करोना बाधित झालेले आतापर्यंत ८५७ रुग्ण सापडले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले तो परिसर आणि ते राहत असलेल्या ३३ हजार ६३६ इमारती आतापर्यंत सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यत १८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.