नागपूर, 17 जानेवारी : पत्नीसोबत झालेल्या वादातून संतापलेल्या पतीने खलबता डोक्यात घालून पत्नीची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली. हत्या केल्यानंतर आरोपी दिवसभर फिरत होता, त्यानंतर स्वत: पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला.
शहरातील वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आंबेडकर नगरमध्ये ही घटना घडली. मृत महिलेचे नाव अल्का सोनपिपळे असं असून तिचा खून करणाऱ्या आरोपीचे नाव सिद्धार्थ सोनपिपळे असं आहे.
आरोपीने स्वतःच्या बायकोची हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्यानंतर खून झाल्याची घटना समोर आली आहे. मृतक अलका ही आरोपी सिद्धार्थ सोनपिपळे याची दुसरी पत्नी होती. पहिल्या बायकोशी पटत नसल्याने त्याने अल्कासोबत दुसरा संसार थाटला होता. गेल्या काही दिवसांपासून अल्का आणि सिद्धार्थ यांच्यात कौटुंबिक कारणांवरून वाद-विवाद सुरू होते. घटनेच्या आधी सुद्धा त्यांच्यात भांडण झाल्याने अल्काने रागाच्या भरात घर सोडले होते.
सकाळी राग शांत झाल्यानंतर ती सकाळी घरी परतल्यानंतर पुन्हा सिद्धार्थने पुन्हा तिच्याशी भांडण केलं. यावेळी आरोपीने घरात ठेवलेल्या बत्याने तिच्या डोक्यावर वार केले. ज्यामुळे अल्काचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी दिवसभर वाडी परिसर फिरत राहिला. मात्र, संध्याकाळ होताच त्याने वाडी पोलीस स्टेशन गाठून बायकोच्या हत्येची कबुली पोलिसांच्या समक्ष दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून अल्काचा मृतदेह उत्तरीय तपासणी करिता पाठवून आरोपी सिद्धार्थ ला अटक केली आहे.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला
दरम्यान, बीड शहरात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राहुल फरताळे असं या जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.
बीड शहरातील सारडा सर्कलजवळ आज दुपारी तीनच्या दरम्यान भर रस्त्यात ही घटना घडली. चौकात उभा असलेल्या राहुल फरताळेवर अज्ञात आलेल्या हल्लेखोरांनी डोळ्यात मिरची पूड टाकली आणि तलवारीने वार केले. हल्ला करून हे हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणी अज्ञात हल्ले खोरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.