नागपूर: नागपूर महापालिकेच्या जुन्या भंगार बसेसचा पुनर्वापर करून महिलांसाठी खास ‘ती बस’ शौचालयचे निर्माण करण्यात येणार आहे. या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक घेतली. परिवहन समितीचे माजी सभापती बंटी कुकडे यांच्या संकल्पनेतून ही योजना साकारली जात आहे. जुन्या भंगारात निघालेल्या बसेसचा पुनर्वापर चांगल्या कामासाठी करण्याच्या प्रयत्नातून त्यांनी ही संकल्पना मांडली होती.
बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, परिवहन विभागाचे यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, साराप्लास्ट इंटरप्राइजेसचे शेखर कांत, संदीप जाट प्रामुख्याने उपस्थित होते.
मनपाद्वारे सुलभ शौचलाये निर्माण करण्यात आलेले आहे. परंतु वर्दळी भागात, आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयासाठी अडचणी जातात. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावी, यादृष्टीने परिवहन विभागाच्या जुन्या भंगार पडलेल्या बसेसचा योग्य पुनर्वापर करून महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. या बसेस ला ‘ती बस’ असे नाव देण्यात येणार आहे. प्रारंभीच्या काळात प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. एक बस ही फिरती राहणार असून, ही बस शहरातील वर्दळीच्या ठिकाणी व आठवडी बाजारात, मार्केट परिसरात राहणार असून एक बस ही राहटे कॉलनी चौकात स्थिर राहणार आहे. अशा ५० बसेस मनपा निर्माण करणार आहे. या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह राहणार असून उरलेल्या थोड्या जागेत उपाहारगृह ठेवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी चहा, नास्ताची सोय राहील, अशी माहिती शेखर कांत यांनी दिली.
अशा प्रकारच्या बसेसमुळे महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. दोन टॉयलेट बसेस लवकरात लवकर सुरू कराव्यात, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.