नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात भव्य रॅली; भाजप आणि आरएसएसचा सहभाग, गडकरींनी साधला काँग्रेसवर निशाणा

नागपूर

नागपूर- केंद्र सरकारने घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभारत तीव्र आंदोलन होत आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीसारख्या घटनाही घडत आहेत. दुसरीकडे नागपूर मध्ये या कायद्याच्या समर्थनात लोकाअधिकार मंचाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही सहभाग घेतला. तसेच, हजारोच्या संख्येने नागरिकांनीही या रॅलीत आपला सहभागी नोंदवला.

या रॅलीदरम्यान नागरिकांनी या कायद्याच्या समर्थनात मोठ्याप्रमाणावर घोषणाबाजी केली. शिवाय हा कायदा कोणाच्याही विरोधात नाही तर देशाहितासाठी असल्याच्याही प्रतिक्रिया दिल्या. दोन दिवसांपूर्वीच नागपूरमध्ये या कायद्याबद्दल विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून आता दहा दिवसीय अभियान राबवले जाणार आहे. देशभर चालवल्या जाणाऱ्या अभियानात तीन कोटींपेक्षा जास्त कुटुंबांशी संपर्क साधला जाईल. भाजपचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी याबाबत शनिवारी माध्यमांना माहिती दिली.

ही समर्थन रॅली यशवंत स्टेडिअम ते संविधान चौकापर्यंत काढण्यात आली. संविधान चौकात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. यावेळी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी सभेला उपस्थित होते. त्याशिवाय, श्री देवनाथ मठाचे पीठाधीश्वर आचार्य स्वामी जितेंद्र नाथ महाराज, गोविंद गिरी महाराजही सभास्थळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, ”हिंदू असणे पाप आहे का? पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तानात 1947 मध्येपाकिस्तानात 22 टक्के लोकसंख्या हिंदूंची होती, जी आज केवळ तीन टक्क्यांवर आली आहे. 19 टक्के हिंदू गेले कुठे? अनेकांचे बळजबरी धर्मांतर करण्यात आले. महिलांवर अत्याचार झाले. पाकिस्तानात नागरिकांचे कोणत्याही प्रकारे संरक्षण केले नाही.”

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी काँग्रेसवरही निशाना साधला. “काँग्रेसने मुस्लिमांच्या विकाससाठी काय केले, केवळ मतांच्या राजकारणासाठी त्यांनी मुस्लिम समाजाचा वापर केला. 1947 पूर्वी अखंड भारत होता. बांगलादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान अशी विभागणी झाली. पाकिस्तान जर मुस्लिम राष्ट्र आहे तर त्या देशातील शिख, हिंदू इतर धर्मीयांवर अन्याय झाला तर ते कुठे जाणार?”

”महात्मा गांधींनी त्या नागरिकांना आश्वासन दिले होते, तुम्हाला ज्या दिवशी असुरक्षित असल्याचे वाटेल, तेव्हा तुम्ही चिंता करू नका, भारत तुम्हाला आधार देईल. गांधींचे हे विचार पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभाई पटेलांनी सांगितले होते. त्याच निर्वासितांना 70 वर्षांनंतर आमच्या सरकारने भारताचे नागरिकत्व दिले. मग आम्ही काय चुकीचे केले?”

Comments

comments