नागपूर, 21 डिसेंबर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मात्र कामाकाजाला सुरुवात होण्याआधी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
शेतकरी कर्जमाफीची आज घोषणा होणार नाही का? असा प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार म्हणाले की, ‘आज काहीही होऊ शकतं. शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार की नाही, हे माहीत नाही. पण माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांबाबत ते सकारात्मक निर्णय घेऊ शकतात.’ अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे आज अधिवेशनात शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ठाकरे आणि फडणवीस येणार आमने-सामने
नागपूर इथे होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजणार आहे. आज सहाव्या दिवशी हे अधिवेशन संपणार आहे. दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधारी पक्षांतर्फे विदर्भाविषयीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. तर विरोधी पक्षातर्फे अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात अंतिम आठवडा प्रस्ताव आहे. तसंच आज सरकारतर्फे जीएसटी सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे.
यंदाच्या विधिमंडळ अधिवेशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारवर केलेली टीका आणि सत्ताधाऱ्यांकडून त्याला मिळालेली खरमरीत उत्तरं यामुळे हे अधिवेशन चांगलंच गाजलं. अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधक दोघेही पुन्हा आमनेसामने येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तसे जुने मित्र. परंतु आता या दोन्ही नेत्यांच्या पक्षांनी वेगळी भूमिका घेतल्याने सभागृहात दोघेही एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशीही उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.