नागपूर अधिवेशनात ‘स्माईल प्लीज’ क्षण, देवेंद्र फडणवीस मात्र हसलेच नाहीत कारण…

नागपूर

नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान थोडे हलके फुलके क्षण नागपूर अधिवेशनादरम्यान आमदारांनी अनुभवले. निमित्त होतं आमदारांच्या फोटोसेशनचं… आणि ही आयडिया होती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची…

नागपूरच्या गुलाबी थंडीत सकाळी सकाळी सगळे आमदार फोटोसाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमले… कुणी जॅकेट घालून, कुणी सदऱ्यात, कुणी जोधपुरीत तर कुणी स्वेटरमध्ये…

पहिल्या रांगेत मान होता तो मंत्र्यांना आणि ज्येष्ठ सदस्यांना… सगळ्यांच्या खुर्च्या ठरल्या होत्या… एकेक जण आला… नेमलेल्या खुर्च्यांवर बसला… उरलेले मागे उभे राहिले… मग मुख्यमंत्री आले… मधल्या खुर्चीवर बसले…

विधानसभा अध्यक्षांच्या बाजूची खुर्ची रिकामी होती… बहुतेक ती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसाठी ठेवली होती… पण फडणवीसांसह भाजपच्या बहुतांश आमदारांना या फोटोसेशनचा निरोपच मिळाला नाही, असं म्हणतात… त्यामुळे फडणवीस आलेच नाहीत.

फोटोत मधली खुर्ची रिकामी बरी दिसत नाही… म्हणून मग विधानसभा अध्यक्षांनी पुढाकार घेत पृथ्वीराज चव्हाणांना मधल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला.

या फोटोफ्रेमचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री वडील पहिल्या रांगेत आणि आमदार मुलगा शेवटच्या रांगेत उभा होता…

मधल्या काळात असाच देवेंद्र फडणवीसांचा असाच फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे शेवटच्या रांगेत उभं राहणाऱ्याला अच्छे दिन येतात असं म्हटलं तर हरकत नाही… आणि मग तो फोटोसेशनमधला फायनल क्षण ‘से चीज’…