नागपूर: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याच्या राजकारणात ही मोठी बातमी आहे. कारण राज्यात महाविकासआघाडीची एकीकडे सत्तास्थापनेची तयारी सुरु असताना हा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र एक सरकार स्थापन केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. एकीकडे शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये सरकार स्थापन करण्याची चर्चा सुरु असताना अचानक आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला स्पष्ट बहुमत दिलं होतं. शिवसेना आमच्या सोबत लढली. पण शिवसेनेने जनतेचा कौल नाकारला. महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज होती. महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे अजित पवार यांचे धन्यवाद.’