मुंबई: संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केलं आहे. “लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करने वालों की कभी हार नहीं होती…बच्चन, हम होंगे कामयाब… जरूर होंगे …”असं आपल्या ट्विटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे. सध्या संजय राऊत लिलावती रुग्णालयात दाखल आहेत. दररोज सकाळी ते पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका मांडत आले आहेत. मात्र सोमवारी अचानक त्यांना छातीत दुखू लागल्याने त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ट्विट मात्र त्यांनी नित्यनियमाने केलं आहे आणि कामयाब अर्थात यशस्वी होण्यात शिवसेना मागे राहणार नसल्याचं जणू त्यांनी नमूद केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच कायम आहे. काँग्रेस आमदार अजूनही जयपूरमध्येच आहेत. महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठीचं संख्याबळ सादर करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना एकीकडे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असताना त्यात आत काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर नवी अट ठेवल्याची माहिती मिळते आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार असेल तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनाला पाठिंबा देईल असं काँग्रेस नेत्यांनी अट ठेवल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेना य़ावर काय भूमिका घेते हे पाहावं लागेल.
काँग्रेससोबत निवडणूक लढवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून निर्णय घेऊ. एकत्र चर्चा करुन निर्णय़ घेऊ. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पण शिवसेनेशिवाय सत्तास्थापन शक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.