मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्प्ट केले आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (शनिवार) नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीच समान सत्तावाटप आणि अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाची मागणी करण्यात आली. या बैठकीत समान सत्तावाटपाबाबत आक्रपणे मागणी करण्यात आली असून उद्धव ठाकरे यांनी भाजपला या मागणीबाबत अप्रत्यक्षपणे निर्वाणीचा इशारा दिला आहे. ठरल्यानुसार मिळालेच पाहिजे, आपण ठरलेल्यापेक्षा एक कणही अधिकचे मागणार नाही असे सांगताना, आपण कोणतेही वेडेवाकडे पर्याय स्वीकारणार नाही, पण… आमच्यासमोर अनेक पर्याय खुले आहेत असे संकेतही उद्धव यांनी दिले आहेत. हा पर्याय म्हणजे भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन करणे हाच असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. आपली मागणी पदरात पाडून घेण्यासाठी भाजपवर दबाव टाकण्यासाठीच उद्धव असे बोलत आहेत असे राजकीय अभ्यासकांना वाटते. मात्र शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही सरकार स्थापन करणार नाही, किंवा सरकार स्थापनेत भागही घेणार नाही, असे सांगितल्यामुळे शिवसेनेला आता भाजपसोबत जाण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही, असेही राजकीय विश्लेषक म्हणत आहेत.
‘८ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका समजेल’
शिवसेनेत प्रवेश करत आमदार झालेले अब्दुल सत्तार यांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत फार तथ्य आहे असे वाटत नसल्याचे वाटते. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची खरी भूमिका ८ नोव्हेंबरला स्पष्ट होईल असे म्हटले आहे. आपण काँग्रेसमध्ये अनेक वर्षे घालवली असून त्यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित आहे. त्यामुळे आमच्यासमोर सत्ता स्थापनेचे अनेक पर्याय खुले आहेत याचा पुनरुच्चार करत अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव कायम ठेवण्याचा शिवसेनेचे प्रयत्न कायम असल्याचे संकेत दिले आहेत.