नागपूर : आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. न्या. सुनील गौर यांनी हा निर्णय दिला. यानंतर चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानं सीबीआयकडून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी पी. चिदंबरम यांना अटकपूर्व जामीन देण्यास ईडी आणि सीबीआयनं विरोध दर्शवला होता. चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसून, त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणे गरजेचे आहे अशी बाजू ईडी आणि सीबीआयने न्यायालयात मांडली होती. आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडून बेकायदेशीरपणे मंजुरी मिळवून देण्यासाठी ३०५ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप चिदंबरम यांच्यावर आहे. हे प्रकरण २००७मधील असून, त्यावेळी चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते. या प्रकरणात सीबीआय आणि ईडीने यापूर्वीच चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना अटक केली होती. सध्या ते जामिनावर आहेत.