नागपूर: केवळ रस्ते, पूलच नव्हे तर प्रदूषणावर मात करण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक, उच्च शिक्षणाच्या सोयी, जीवनमान उंचावणारे प्रकल्प या माध्यमातून नागपूर शाश्वत विकासाकडे वाटचाल करीत आहे. नावीन्यपूर्ण संकल्पना लोकांकडूनच आमंत्रित करून शासकीय विभागातील प्रश्न सोडविण्यात त्याचा उपयोग केला जात आहे. जागतिक स्तरावर नवी ओळख तयार होण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने नागपूर महानगर पालिका मुख्यालयातील हिरवळीवर ध्वजवंदन कार्यक्रम सोहळ्यात त्या बोलत होत्या. मंचावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अभिजीत बांगर, मंगळवारी झोन सभापती गार्गी चोपडा, नेहरूनगर झोन सभापती समिता चकोले,सातरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे यांची उपस्थिती होती.
महापौर नंदा जिचकार यांनी आपल्या भाषणात जम्मू-काश्मीर मध्ये कलम ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर तेथील सर्व गावांत आज तिरंगा फडकणार असल्याचा गौरवोल्लेख केला. कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दुरदृष्टीतून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूर शहराच्या होत असलेल्या चौफेर विकासावर त्यांनी प्रकाश टाकला.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर अग्निशमन पथकाकडून मानवंदना स्वीकारली. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आणि आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ऐवजदार आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सत्कार करण्यात आला. महापौरांनी यावेळी अवयवदानाची शपथ उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे संचालन एनएसएससीडीसीएलचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, राम जोशी, अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, डॉ. रंजना लाडे, डॉ. आर. झेड सिद्दीकी, उपसंचालक (आरोग्य) डॉ. भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. सरिता कामदार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, निगम सचिव हरिश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, सहायक संचालक (नगर रचना) प्रमोद गावंडे, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रिकोटकर, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, विजय हुमने, मिलिंद मेश्राम, राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, राजू राहाटे, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांच्यासह सर्व सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा: इनोव्हेशन पर्वमुळे शहराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणार : महापौर नंदा जिचकार