नागपूर: महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे एकीकडे नाागपूरकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तर दुसरीकडे मनपा प्रशासनाच्या आशीर्वादाने पे अॅण्ड पार्कच्या नावावर सुरू असलेल्या अवैध वसुलीचा भुर्दंडही सोसावा लागतो. मनपाच्या वाहतूक विभागाने गुरुवारी ‘मोठी’ कारवाई करत अवैध पार्किंगवसुली स्थळावरील फक्त फलके काढून नेली. मात्र, वसुली करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पार्किंगच्या वसुलीभाईंसोबत वाहतूक विभागाची मिलीभगत स्पष्ट होत आहे.
महापालिकेच्या वाहतूक विभागाला काही महिन्यांपूर्वी माहिती अधिकार कायद्याअंतर्गंत शहरातील वैध पार्किंग स्थळांबद्दलची माहिती मागण्यात आली होती. यावेळीही विभागाकडून अर्जदाराला कुठलीही पूर्वकल्पना न देता अर्ज परस्पर मनपाच्या बाजार विभागाकडे वर्ग करण्यात आला होता. यावेळी बाजार विभागांतर्गत येणाऱ्या सायकल स्टॅण्डची माहिती देण्यात आली होती. यावेळी शहरातील मोक्याच्या ठिकाणी सुरू असलेल्या पे अॅण्ड पार्क स्थळांची माहिती लपविण्यात आली होती. त्यामुळे मनपाचे वाहतूक विभाग काय लपविण्याचा प्रयत्न करीत आहे, हा चर्चेचा विषय ठरत आहे.
पोलिसांना तक्रारीची प्रतीक्षा
एकीकडे शहरात चौका-चौकांत पोलिसांकडून वाहनचालकांवर कारवाईचा धडाका लावण्यात येत असतो. यात आम्हाला नागरिकांच्या सुरक्षेची चिंता असल्याचे पोलिस सांगतात. दुसरीकडे, मनपा आणि नासुप्रच्या जागेवर ताबा करून वसुलीभाईंकडून दिवसाढवळ्या सुरू असलेली लूट या कर्तव्यदक्ष पोलिसांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. सीताबर्डी येथील नासुप्रचे पार्किंगतळ सीताबर्डी पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. दुसरीकडे, धंतोलीतील अवैध वसुलीस्थळ धंतोली पोलिस ठाण्यापासून काहीच मीटरच्या अंतरावर आहे. तरी पोलिसांकडून या समाजकंटकांवर कारवाई करण्यात येत नसल्याने त्यांच्या भूमिकेबद्दलही नागरिकांमध्ये संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : भाजपनं विधानसभा निवडणुकीचा बिगुल फुंकला, महाजनादेश यात्रेला सुरुवात