नागपूर : दारु पिण्यास पैसे न देणाऱ्याची हत्या करणाऱ्या तिघांवरील आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. काझी यांनी तिन्ही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विश्वास राजेश दहीवाले (वय ३०, रा. न्यू इंदोरा, जैतवन बौद्ध विहाराजवळ), सूरज राजु मानवटकर (वय २३, रा. महादुला, फुलेनगर) आणि कमलेश कालीचरण पाटील (वय ३०, रा. हिंन्दुस्तान कॉलनी, पुलगांव, जिल्हा वर्धा) अशी या आरोपींची नावे आहे. त्यांच्यावर राकेश बापुराव रामटेके (वय ४५, रा. बाराखोली) याच्या हत्येचा आरोप होता.
घटना २९ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री ११ वाजता जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिपब्लिकननगर या परिसरात घडली होती. तिन्ही आरोपींना दारुचे व्यसन होते तसेच तिघेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. दारुचे व्यसन पूर्ण करण्यासाठी ते अनेकदा राकेशकडे येत आणि त्याला पैसे मागत. घटनेच्या दिवशी राकेशने दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला. यामुळे हे तिघेही चिडले आणि त्यांनी लाकडी स्टंप आणि दांड्याने राकेशवर हल्ला चढविला. यात राकेश गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारालाठी मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
राकेशची पत्नी वैशाली राकेश रामटेके हिने दिलेल्या तक्रारीच्या आधारावर जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. पोलिस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केला. याप्रकरणी अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी सरकारची तर अॅड. चंद्रशेखर जलतारे, अॅड. चेतन ठाकूर, अॅड. एफ. भगवानी यांनी बचावपक्षाची बाजू मांडली. हवालदार रवीकिरण, नायब पोलिस शिपायी योगेश डबले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम बघितले.
अधिक वाचा : ‘बरसात के मौसम में’ हुई गीतों की बारिश