नागपूर : चंद्रपूर वन्यजीवांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असताना चिमूर वनपरिक्षेत्रातील मेटेपार गावाजवळील शेतशिवारात वाघिणीसह तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. सोमवारी सकाळी नऊ वाजता सदर घटना उघडकीस आली. त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी एकास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
चिमूर वनपरिक्षेत्रातील शंकरपूर उपक्षेत्रात मेटेपार गावालगतच्या नाल्याजवळ सर्व्हे नंबर ६२ मध्ये पडीक जमीन आहे. तेथे शेतमालकासह काही जण सोमवारी सकाळी जांभळं तोडण्यासाठी गेले असता वाघीण आणि तिचे दोन बछडे मृतावस्थेत आढळले. दोन्ही बछडे साधारणत: एक ते दीड वर्षांचे होते. ही माहिती परिसरात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तरुण पर्यावरणवादी मंडळाला दिली. त्यांनी वन अधिकाऱ्यांना कळविले. घटनास्थळपासून काही अंतरावर एक वासरू मृतावस्थेत आढळले. वन विभागाच्या खडसंगी कार्यालयात या तिन्ही वाघांचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, डॉ. नगराळे, डॉ. कुंदन यांनी केले. यामध्ये वाघीण आणि बछड्यांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाल्याचे समोर येत आहे. याप्रकरणी पांडुरंग चौधरी याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने वासराच्या मृतदेहावर विष टाकल्याची कबुली दिली असून बेवारस कुत्र्यांना मारण्यासाठी हे केल्याचे त्याने सांगितले, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली. तरीदेखील त्याचा नेमका उद्देश तपासणीदरम्यान समोर येईल, असे सूत्रांनी नमूद केले. वाघिणीसह बछड्यांचे सर्व अवयव शाबूत असून बछड्यांपैकी एक नर तर दुसरी मादी होती. तिन्ही वाघांचे नमुने घेण्यात आले असून नागपूर येथील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. घटनास्थळी मुख्य वनसंरक्षक एस.व्ही. रामाराव, ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग, सहाय्यक वनसंरक्षक रामेश्वरी भोंगाडे, वनपरिक्षेत्राधिकारी भाविक चिवंडे व सतीश उटगे प्रामुख्याने उपस्थित होते.
वनमंत्र्यांचे चौकशीचे निर्देश
मेटेपार येथील तलावाजवळ वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. घातपात किंवा शिकार झाली असल्यास सक्षम यंत्रणेद्वारे त्याचा तपास करावा, दोषींवर कडक कारवाई करावी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टीने आवश्यक खबरदारी व उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिले आहेत.
अधिक वाचा : नागपूर : ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक ; चार ठार